Mumbai News : मुंबई : चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची गोल्फर अदिती अशोकने रौप्यपदक जिंकले आहे. या कामगिरीमुळे अदिती गोल्फमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
ठरली पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिलांनी यापूर्वी कधीही गोल्फ पदक जिंकले नव्हते. यापूर्वी गोल्फमधील आशियाई खेळांमध्ये लक्ष्मण सिंग (१९८२) आणि शिव कपूर (२००२) या दोनच भारतीय पुरुषांनी वैयक्तिक गोल्फ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, (Sports News) तर याशिवाय पुरुषांच्या सांघिक स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक जिंकले होते. अदितीपूर्वी भारताने २०१० मध्ये भारतात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये शेवटचे पदक जिंकले होते.
आदिती अशोकने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवून भारतात खळबळ माजवली आणि त्यानंतर देशात गोल्फची लोकप्रियता झपाट्याने वाढली. अदिती अशोक २०१६ मध्ये प्रो टर्निंग झाल्यापासून भारतातील महिला गोल्फची प्रमुख आहे. अदितीने लेडीज युरोपियन टूर टाइल्सचे विजेतेपद पटकावले आहे आणि लेडीज प्रोफेशनल गोल्फ टूर (LPGA) मध्ये ती नियमितपणे सहभागी झाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील अदिती सुवर्णपदकाची दावेदार होती. मात्र, एका फेरीत खराब कामगिरी केल्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. २०२१ मध्ये जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे अदिती अशोक ही चर्चेत आली होती. (Sports News) त्यावेळी तिला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. मात्र कामगिरीत सातत्य ठेवत अदितीने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला.
अदिती अशोकने जिंकलेल्या रौप्यपदकाबरोबरच भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. भारतीय क्रीडापटूंनी या स्पर्धेत आतापर्यंत १० सुवर्ण, १५ रौप्य आणि १४ कांस्यपदके जिंकली आहेत. यात भारताला सर्वाधिक पदके ही नेमबाजीमध्ये मिळाली आहेत. (Sports News) नेमबाजीमध्ये भारताने आतापर्यंत ६ सुवर्ण ८ रौप्य आणि ५ कांस्य अशी मिळून एकूण १९ पदके जिंकली आहेत.