Champion Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवण्यास बीसीसीआयने नकार दिल्यानंतर आता पाकिस्तानने धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘द डॉन’ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हवाला देत एक रिपोर्ट शेअर केला आहे की, जर या स्पर्धेच्या होस्टिंगचे अधिकार पाकिस्तानकडून काढण्यात आले, तर ते पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आपले नाव मागे घेऊ शकते. पीसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने डॉनने ही माहिती दिली आहे.
भारताने संघ पाठविण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी रविवारी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी भविष्यातील कारवाईबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. PCB ने रविवारी पुष्टी केली की भारताने पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास आपल्या अनिच्छेबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) कळवले आहे. नक्वी यांनी याआधी या स्पर्धेसाठी ‘हायब्रीड मॉडेल’ची योजना नाकारली होती.
हायब्रीड मॉडेल अंतर्गत, भारत आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळेल आणि उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील. आशिया चषक 2023 देखील अशाच पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता भारताने नकार दिल्यानंतर आयसीसी ही संपूर्ण स्पर्धा दुसऱ्या देशात हलवण्याचा विचार करत आहे. आता पीसीबीच्या एका सूत्राने डॉनला सांगितले की, ‘टूर्नामेंट हलवल्यास पाकिस्तान सरकार पीसीबीला या स्पर्धेत खेळण्यास नकार देण्यास सांगत आहे.’ पाकिस्तान सरकार या प्रश्नाकडे आता गांभीर्याने लक्ष देत आहे.
मोहसीन नक्वी, जे केंद्रीय गृहमंत्री देखील आहेत, पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. ते सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ काय सूचना देतात ते बघत होते. यासोबतच, भारत सरकार आपल्या धोरणात बदल करत नाही तोपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही आयसीसी किंवा इतर बहु-सांघिक स्पर्धांमध्ये भारताविरुद्ध खेळणे थांबवण्याचे निर्देश देशाचे सरकार पीसीबीला देऊ शकते.