पुणे प्राईम न्यूज: शुभमन गिल आजारी पडल्यामुळे टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिल गेल्या एक वर्षापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे या विश्वचषकात टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच त्याला डेंग्यू झाला. त्यामुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. भारताने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून विश्वचषकाची शानदार सुरुवात केली असली, तरी टीम इंडियाला शुभमन गिलची उणीव नक्कीच जाणवत आहे.
आता भारताचा पाकिस्तानसोबतचा सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरू शकेल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, आज तो नेटमध्ये सराव करताना दिसला. ही भारतीय संघासाठी चांगली बातमी आहे.
आशिया कपच्या पाकिस्तानसोबतच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मासह शुभमनने शानदार सुरुवात करून पाकिस्तानी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. अशा परिस्थितीत गिलने पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात पुनरागमन केल्यास पाकिस्तानी गोलंदाजांवर अतिरिक्त दबाव निर्माण होईल आणि भारतीय संघही मजबूत होईल.
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी शुभमनला डेंग्यूचा ताप आला होता. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला निरीक्षणाखाली ठेवले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
भारताच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले होते की, शुभमन गिल आता बरा आहे आणि तो खूप वेगाने बरा होत आहे. अफगाणिस्तान सामन्यापूर्वी गिल संघासह दिल्लीला गेला नसून, पाकिस्तान सामन्यापूर्वी अहमदाबादला पोहोचला आहे. त्याने नेटमध्ये सरावही सुरू केला आहे. अशा परिस्थितीत आता भारताचा हा युवा खेळाडू पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू शकेल, अशी आशा आहे.