पुणे प्राईम न्यूज: गुरुवारपासून विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. याआधी भारतीय टीम आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सलामीवीर फलदांज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शुभमन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर होऊ शकतो. पण, सध्या तरी याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नई येथे होणार आहे. याआधी टीम इंडिया एमए चिदंबरम स्टेडियमवर सराव करत आहे. मात्र, शुभमनने सरावात भाग घेतला नाही. त्यांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. सध्या शुभमन हा टीम व्यवस्थापन आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. शुक्रवारी त्यांची पुन्हा चाचणी होणार आहे. शुभमनची रिकव्हरी चांगली असेल तरच तो खेळण्याची शक्यता आहे. पण जर तो सावरला नाही, तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडेल.
अशा परिस्थितीत भारताकडे इशान किशन आणि केएल राहुलच्या रूपाने दोन पर्याय आहेत. कर्णधार रोहित शर्मासोबत केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. केएल राहुलबद्दल बोलायचे झाले, तर तो भारतासाठी 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळला आहे. यामध्ये त्याने 669 धावा केल्या आहेत. सलामीला फलंदाजी करताना राहुलने 2 शतके आणि 5 अर्धशतकेही झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये खेळला गेला होता. न्यूझीलंडने तो 9 गडी राखून जिंकला. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. रविवारी चेन्नईत हा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.
हेही वाचा:
Asian Games: भारताची फायनलमध्ये धडक, बांगलादेशवर दणदणीत विजय, आता नजर गोल्ड मेडलवर