नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी घटस्फोट घेत तिसरे लग्न केल्याने तो चर्चेत आला. त्यानंतर आता शोएब मलिक मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकल्यामुळे चर्चेत आला आहे. बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूवर मॅच फिक्सिंगचा संशय आहे. फ्रँचायझी टीम फॉर्च्युन बरीशालने त्याच्यावर कडक कारवाई करत करार रद्द केल्याचे वृत्त आहे.
यापूर्वीही पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंची नावे मॅच फिक्सिंगमध्ये आली आहेत. ही काही नवीन गोष्ट नाही. याआधीही अनेक मोठी नावे यामध्ये पुढे आली आहेत. त्यामुळे एक कर्णधार आणि दोन गोलंदाजांची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. आता माजी कर्णधार शोएब मलिकचे नाव फिक्सिंगशी जोडले गेल्याचे दिसत आहे. बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान त्याने खुलना टायगर्सविरुद्ध एका षटकात तीन नो बॉल टाकले. त्यामुळे त्याच्यावर फिक्सिंगचा संशय व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकवर मॅच फिक्सिंगचा संशय असल्याने फॉर्च्युन बरीशाल संघाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. खुलना टायगर्सविरुद्धच्या सामन्यात मलिकने एकाच षटकात तीन नो बॉल टाकले होते. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याची सतत चर्चा होत होती. एका ओव्हरमध्ये तीन नो बॉल टाकणे हे स्पिनरसाठी विचित्र गोष्ट आहे. याच कारणामुळे मलिकच्या फिक्सिंगची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
बांगलादेश प्रीमियर लीगच्या फ्रँचायझी संघाने शोएब मलिकसोबतचा करार रद्द केला आहे. यामागचे कारण त्याच्याविरुद्ध फिक्सिंग तपास असल्याचे सांगितले जात आहे. मलिक दोषी आढळल्यास कठोर शिक्षेचा निर्णयही होऊ शकतो. या पाकिस्तानी खेळाडूवर बीपीएल खेळण्यावर कायमची बंदी घातली जाऊ शकते. बरं, यासंदर्भात अशीही बातमी आहे की, लीगमध्ये फलंदाज म्हणून जास्त संधी न मिळाल्याने मलिकने स्वतः संघ सोडला आहे.