Sharad Pavar : बीड : पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. (Sharad Pavar)
धनंजय मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआयसह आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले गेले. त्यात भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यांसारखे निर्णय झाले. त्यांचं क्रिकेट विश्वातील नाव पाहता गहुंजे स्टेडियमला शरद पवार नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली. (Sharad Pavar)
मोटेराला मोदींचं तसेच गहुंजेला पवारांचं नाव द्यावं
ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला देण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. (Sharad Pavar)