Rollball World Cup | पुणे : सहाव्या वरिष्ठ गटाच्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेचे बिगुल वाजले असून आज (दि.२१) पासून या रोमहर्षक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत २७ देश सहभागी झाले असून ते विजेतेपदासाठी भिडणार आहेत.
ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉल मध्ये रंगणार आहे. स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उच्च तंत्र व शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सायं ४ वाजता करण्यात येणार असून यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे उदघाटन सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात येणार असून, यावेळी विविध कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत.
स्पर्धेची पहिली लढत पुरुष विभागातील होणार असून या लढतीमध्ये भारतासमोर पोलंड संघाचे आव्हान असणार आहे. महिला विभागातील पहिली लढत अ गटातील नेपाळ व इजिप्त या दोन संघांदरम्यान होणार आहे.
पुरुष विभागातून २३ संघ तर महिला विभागातून ११ संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष डॉ. आनंद यादव व स्पर्धा तांत्रिक अध्यक्ष जेकब न्याऊडोह (केनिया) यांनी जाहीर केलेली गटवारी पुढीलप्रमाणे :
पुरुष विभाग :
अ गट : भारत, अर्जेंटिना, इजिप्त, फिजी, पोलंड व युगांडा
ब गट : केनिया, श्रीलंका, आयव्हरी कोस्ट, फ्रान्स, इराण व सिएरा लिओन
क गट : बेलारूस, सौदी अरेबिया, नेपाळ, गिनी, ओमान व ब्राझील
ड गट: न्युझीलंड, येमेन, युएई, इंग्लंड, लॅटव्हिया
महिला विभाग :
अ गट : केनिया, फ्रान्स, आयव्हरी कोस्ट, श्रीलंका, नेपाळ व इजिप्त
ब गट : भारत, पोलंड, लॅटव्हिया, अर्जेंटिना, सिएरा लिओन