World Cup 2023: नवी दिल्ली: रोहित शर्माने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 550 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम फेरीतही तो ही कामगिरी कायम ठेवेल, अशी अपेक्षा आहे. कारण आतापर्यंत एकाही भारतीय कर्णधाराने वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शतक झळकावले नाही. अशा परिस्थितीत रोहित हा मोठा टप्पा गाठू शकतो का, हे पाहावे लागेल. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सलग 10 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने पहिले 2 सामने गमावल्यानंतर सलग 8 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.
.
टीम इंडियाने न्यूझीलंडचा तर ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. माहीने 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध नाबाद 91 धावा केल्या होत्या. 5व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून त्याने षटकार मारून संघाला चॅम्पियन बनवले. धोनीने 79 चेंडूंचा सामना केला होता. 8 चौकार आणि 2 षटकार मारले. या सामन्यात गौतम गंभीरनेही महत्त्वपूर्ण 97 धावा केल्या.
कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने 2003 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 धावा केल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाला 125 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. गांगुलीची विकेट ब्रेट लीने घेतली. सामन्यात ऑस्ट्रेलियाने 359 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 234 धावा करू शकला. 1983 च्या फायनलमध्ये वेगवान गोलंदाज आणि कर्णधार कपिल देवने वेस्ट इंडिजविरुद्ध 15 धावा केल्या होत्या. त्याने 11 षटकांत 21 धावा देऊन एक विकेटही घेतली.
रोहित शर्मा विश्वचषक 2023 मध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये शानदार फलंदाजी करत आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 55 च्या सरासरीने 550 धावा केल्या आहेत. 131 धावा ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 62 चौकार आणि 28 षटकार मारले. विराट कोहलीने सर्वाधिक 711 धावा केल्या आहेत. त्याने 3 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.