मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारला शुक्रवारी (ता. ३० ) अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर देहरादूनच्या येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम पंतवर लक्ष ठेवून आहे. तसेच रिषभ पंत हा सहा महिने तरी क्रिकेटच्या मैदानावर परतणार नसल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे .
रिषभ हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करतो. मात्र, अपघातामुळे त्याचे आयपीएलच्या पुढच्या हंगामात खेळणे जवळपास अशक्य मानले जात आहे. यामुळे दिल्लीचा संघ आता नव्या कर्णधाराच्या शोधात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, जानेवारीत होणार्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि वन-डे मालिकेत रिषभ पंतची निवड झाली नव्हती. याशिवाय फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका होणार आहे, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
रिषभच्या टी-२०, वन-डे सामन्यांसाठीच्या निवडीवर शंका आहे, पण तो कसोटीत सर्वोत्तम खेळाडू आहे. अशा परिस्थितीत तो सावरला नाही तर टीम इंडियाचा तणाव वाढू शकतो.