लखनौ: विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी भुवनेश्वर कुमारच्या जागेवर रिंकू सिंह याची उत्तर प्रदेश (यूपी) संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेमध्ये रिंकू सिंहने कर्णधारपदाची धुरा वाहिली होती. वरिष्ठ पातळीवर रिंकू प्रथमच एखाद्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
कर्णधारपदी निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना रिंकू सिंगने सांगितले की, यूपी टी-२० लीगसाठी नेतृत्व करणे ही माझ्यासाठी मोठी संधी होती. मला त्यातून खूप काही शिकता आले. मी या स्पर्धेत गोलंदाजी (ऑफ स्पिन) आजमावून पाहिली. त्याने पुढे सांगितले की, सध्याच्या क्रिकेटला परिपूर्ण खेळाडूची आवश्यकता असते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात खेळाडू तरबेज असावा लागतो. आता मी गोलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. उत्तर प्रदेशचे नेतृत्व हाती आल्याने माझी जबाबदारी वाढली आहे.
दरम्यान, रिंकूला अशा वेळी नेतृत्वाची धुरा मिळाली आहे, ज्यावेळी तो खेळत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल २०२५ मोसमासाठी कर्णधाराची निवड करायची आहे. तथापि, रिंकूने स्पष्ट केले की, सध्या मी उत्तर प्रदेशला विजय हजारे करंडक मिळवून देण्याकडे लक्ष देत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाविषयी फारसा विचार करत नाही. दरम्यान, या स्पर्धेचा उपयोग निवडकर्त्यांना फेब्रुवारीत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड करण्यास होणार आहे. रिंकू हा यंदाच्या विश्वचषकानंतर भारताच्या टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने आतापर्यंत केवळ दोन वनडे सामने खेळले आहेत.