मुंबई : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. तिने चिनच्या वांग झी यीला पराभूत करत सिंगापूर ओपनच्या पदकावर आपलं नाव कोरलं आहे. पीव्ही सिंधूने रविवारी पार पडलेल्या सिंगापूर ओपन २०२२ मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यीचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आहे.
सिंगापूर ओपन २०२२ च्या अंतिम सामन्यात पी व्ही सिंधूनं अप्रतिम खेळी साकारली आहे. तिने पहिल्याच सेटमध्ये सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पण दुसऱ्या सेटमध्ये चिनच्या वांग झी यीने कडवी झुंज दिली. परंतु अंतिम सेटमध्ये सिंधून चांगल्याप्रकारे पुनरागमन करत सिंगापूर ओपनवर आपलं नाव कोरलं आहे. पी. व्ही सिंधूने 2022 च्या हंगामात तिचे पहिले सुपर 500 विजेतेपद जिंकले.
यापूर्वी जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या बिगरमानांकित सायना कावाकामीचा सरळ गेममध्ये पराभव केला होता. सिंधूने उपांत्य फेरीत 21-15, 21-7 अशा फरकाने सहज विजय मिळवला होता. जपानी स्टार कावाकामी एकदाही सिंधूवर मात करताना दिसला नाही.