रावळपिंडी : इंग्लंडने दिलेल्या ६५७ धावांच्या डोंगरासमोर पाकिस्तानने संथ परंतु दमदार सुरुवात केली आहे. आज कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर बिनबाद १८१ धावा केल्या. पाकिस्तानच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांना ५१ षटकांत एकही गडी बाद करता आला नाही.
आजच्या दिवशी उपहाराला थोडाच अवधी शिल्लक असताना इंग्लंडचा संपुष्टात आला. त्यानंतर पाकिस्तानचे सलामीवीर अब्दुल्लाह शफिक व इमाम उल हक यांनी डावाची सुरुवात केली. दिवसाअखेर पर्यंत दोन्ही सलामीवीर शतकांच्या उंबरठ्यावर होते.
अब्दुल्लाह शफिकने १५८ चेंडूंचा सामना करताना १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. तर दुसरा सलामीवीर इमान उल हकने १४८ चेंडूत ९० धावांची खेळी १३ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने सजविली. दोन्ही सलामीवीरांनी तब्बल ३०६ चेंडूत खेळताना संघाला संथ परंतु दमदार सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांनी अनेकदा चकविले मात्र, दोन्ही फलंदाजांनी आपला संयम ढळू दिला नाही.
तत्पूर्वी, आज सकाळी इंग्लंड संघाने ७५ षटकांत ४ बाद ५०६ धावांपासून पुढे फलंदाजीला सुरुवात केली. मात्र लढतीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव गडगडला असून इंग्लंडचा डाव १०१ षटकांत ६५७ धावांवर संपुष्टात आला.
उद्याचा दिवस महत्वाचा
लढतीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानला एकही इंग्लंडचा एकही गडी बाद करता आला नाही. मात्र दुसऱ्या सत्रापासून चेंडू रिव्हर्स स्विंग होण्यास सुरुवात झाली. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगर टाकल्याने रिवर्स स्विंग देखील निष्प्रभ ठरला. दुसऱ्या दिवशी मात्र चेंडू जुना झाला होता. त्यावेळी पाकिस्तानी गोलंदाजांनी अनुभव पणाला लावताना इंग्लंडला केवळ दीडशे धावा देताना त्यांचे ६ गडी बाद केले. दुसऱ्या दिवशी पाकिस्तान फलंदाजीला आल्यानंतर देखील चेंडू सुमारे ५० षटके जुना झाला आहे. यामुळे इंग्लंडचे गोलंदाज चेंडूचा वापर कसा करतात यावर या लढतीचा परिणाम अवलंबून आहे.