रावळपिंडी : इंग्लंडने दिलेल्या ६५७ धावांच्या आव्हानाला पाकिस्तानने देखील चोख प्रत्युत्तर देताना ७ बाद ४९९ धावा केल्या. त्यामुळे ही कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. कसोटी लढतीचे केवळ दोनच दिवस बाकी असल्याने उद्या पाकिस्तान कधी पर्यंत खेळणार कि सर्वबाद होऊन इंग्लंड पुन्हा फलंदाजीला येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इंग्लंड संघाकडे अजूनही १५८ धावांची महत्वपूर्ण आघाडी आहे.
काल पाकिस्तान संघाने एकही गडी न गमावता १८१ धावा केल्या होत्या. तेथून आज डावाला सुरुवात झाली. काल नाबाद असणारे अब्दुल्लाह शफिकने व इमान उल हकने यांनी खेळाला सुरुवात केली. दोघांनीही शतकी खेळी केल्या. मात्र शतकी खेळीनंतर दोघेही आज झटपट बाद झाले. अब्दुल्लाह शफिकने २०३ चेंडूत १३ चौकार व ३ षटकार मारताना ११४ धावांची तर इमाम उल हकने २०७ चेंडूत १५ चौकार व २ षटकार मारताना १२१ धावांची खेळी केली. दोघांनी पाकिस्तान संघासाठी २२५ धावांची सलामी दिली.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अझर अलीने केवळ २७ धावांची भर घालून तंबूत परतला. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने लढतीची सगळी सूत्रे हाती घेताना आक्रमण आणि संयम यांचा सुरेख संगम दाखवताना आपली शतकी खेळी केली. बाबर आझमने १६८ चेंडूत १९ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने १३६ धावा तडकावल्या. त्याला सौद शकीलने ३७, मोहम्मद रिझवानने २९, अघा सलमानने नाबाद १० धावा करताना बाबर आझमला साथ दिली.
विल जॅकसने ३, जॅक लीचने २ तर जेम्स अँडरसन व ऑली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
चौथ्या दिवस इंग्लंडसाठी महत्वाचा
उद्या लढतीचा चौथा दिवस आहे. पाकिस्तान अजूनही १५८ धावांनी पिछाडीवर आहे. उद्याच्या दिवसात पाकिस्तानला पिछाडीच्या १५८ धावा सोडून किमान १०० धावा कराव्या लागणार आहेत. मात्र इंग्लंडला केवळ ३ गडी बाद करायचे आहेत. यात देखील सर्व महत्वाचे फलंदाज बाद झाल्याने पाकिस्तानचे गोलंदाज फलंदाजी बाकी असणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा डाव सकाळी लवकर संपवून किमान संध्याकाळ पर्यंत यात अजून २५० धावा जोडण्याचे इंग्लंडचे लक्ष्य असणार आहे. तरच पाचव्या दिवशी पाकिस्तान समोर सरासरी ३०० ते ३५० धावांचे लक्ष्य इंग्लंड ठेवू शकणार आहे.