Pakistan Semi Final Scenario: नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. न्यूझीलंड संघाने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला. किवी संघाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले असले, तरी पाकिस्तानसाठी अजूनही काही आशा आहेत. त्यांना पुढे जायचे असेल, तर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवावी लागेल.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यावर पाकिस्तान क्रिकेट संघाचे लक्ष लागले होते. बाबर आझमच्या संघाला या सामन्यात पावसाची अपेक्षा होती, ज्यामुळे सामना होऊ शकणार नाही. जर सामना झालाच तर श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंडला हरवावे, अशी प्रार्थना होती. पाकिस्तानला हवे असलेली एकही गोष्ट घडली नाही. किवी संघाने श्रीलंकेने दिलेले 172 धावांचे लक्ष्य केवळ 23.2 षटकांत पूर्ण करून सामना संपवला. आता पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवावी लागेल.
पाकिस्तानसमोर अशक्य काम
न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आता त्याच्यासमोर उरलेले काम अशक्य शक्य करून दाखवण्यासारखे होईल. जर पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल, तर त्यांना प्रथम इंग्लंडविरुद्ध असे काही करावे लागेल जे या संघाने आजपर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये केले नाही.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 400 धावा कराव्या लागणार आहेत. यानंतर, त्यांच्या गोलंदाजांना इंग्लिश संघाची फलंदाजी केवळ 112 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखावी लागेल. याचा अर्थ पाकिस्तानच्या विजयाचे अंतर 288 किंवा त्याहून अधिक असावे लागेल. त्याचवेळी पाकिस्तान संघ नाणेफेक हरला आणि इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर त्याच क्षणी बाबर आझमचा संघ विश्वचषकातून बाहेर पडेल. (Pakistan Semi Final Scenario)