अहमदाबाद, (गुजरात) : विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 191 धावांवर आटोपला आहे. भारताला विजयासाठी 192 धावांचे आव्हान आहे. अहमदाबादमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने अर्धशतक झळकावले. मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी केली
पाक संघ चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही..
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 42.5 षटकांत 191 धावा केल्या. संघाचा पहिला फलंदाज 41 धावांवर बाद झाला. शफिक 20 धावा करून बाद झाला. यानंतर इमाम उल हक 36 धावा करून बाद झाला. इमाम आणि शफीक बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि रिझवान यांनी संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. पण त्याचा फायदा संघाला करता आला नाही. बाबरने 58 चेंडूत 50 धावा केल्या. रिझवानने 49 धावा केल्या. रिझवानने 7 चौकार मारले.
पाकिस्तानचा डाव पत्त्यांसारखा कोसळला..
बाबर आणि रिझवान बाद झाल्यानंतर संघ पत्त्यांसारखा कोसळला. इफ्तिखार अहमद 4 धावा करून बाद झाला. शादाब खान 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद वासिम 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हसन अली 12 धावा करून बाद झाला, शाहीन आफ्रिदी 2 धावा करून नाबाद राहिला. अशा प्रकारे संपूर्ण संघ ऑलआऊट झाला.
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा..
अहमदाबादमध्ये भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहने 7 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. मोहम्मद सिराजने 8 षटकात 50 धावा देत 2 बळी घेतले. हार्दिक पांड्याने 6 षटकात 34 धावा देत 2 बळी घेतले. कुलदीप यादवने 10 षटकात 35 धावा देत 2 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 9.5 षटकात 38 धावा देत 2 बळी घेतले.