क्रीडा वृत्त : आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ‘अ’ संघाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं आहे. श्रीलंका ‘अ’ संघाने भारतीय संघाचा मोठ्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता श्रीलंकेने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. भारताने प्रथम फलंदाजी करत 317 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत हे लक्ष्य अवघ्या 41.3 षटकांत पूर्ण केलं.

या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार तिलक वर्माने सामन्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते, सुरुवातीला खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. त्यामुळे भारतीय संघाला 320 ते 330 धावांची मजल मारता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, 20 षटकांनंतर खेळपट्टीचा वेग कमी झाला आणि काही चेंडू वळू लागले. याच काळात भारताने सलग 3 विकेट्स गमावल्या. त्यानंतर तनुष आणि शाहबाज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या योगदानामुळे भारताला 317 धावांपर्यंत पोहोचता आलं.
लक्ष्याचा बचाव करताना भारतीय संघाने पहिल्या 15 षटकांत श्रीलंकेच्या धावगतीवर नियंत्रण ठेवण्याची योजना आखली होती. प्रतिस्पर्ध्यांना प्रति षटक 6 पेक्षा कमी धावा करू द्यायच्या, अशी रणनीती होती. पुढे खेळपट्टी संथ होईल आणि गोलंदाजांना मदत मिळेल, असा भारतीय संघाचा अंदाज होता. मात्र, मैदानात ही योजना प्रभावीपणे राबवता आली नाही, असं तिलकने मान्य केलं.

श्रीलंकेच्या सलामीवीरांनी 174 धावांची भागीदारी करत भारताच्या अडचणी वाढवल्या. भारतीय गोलंदाजांना त्यांची जोडी फोडण्यात यश आलं नाही. तिलकने श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांचं कौतुक केलं. गोलंदाजांनी विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांना खेळपट्टीची साथ मिळाली नाही. हा आमच्यासाठी खराब दिवस होता, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.







