मुंबई : जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना आता सरकारी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. राज्य सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे, अर्जाची स्थिती तपासणे आणि सुनावणीला उपस्थित राहणे या सुविधा डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

नव्या व्यवस्थेत शैक्षणिक कारणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर निवडणूक आणि इतर कारणांसाठी अर्ज करताना 500 ते 1,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या मदतीने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (CCVIS) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे अर्जदारांना घरबसल्या अर्ज करता येणार असून, आवश्यक कागदपत्रे आणि शपथपत्रेही ऑनलाइन अपलोड करता येतील.

विशेष म्हणजे, अर्जदारांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेता येईल. अर्जातील माहिती पुन्हा पुन्हा भरण्याची गरज कमी होणार आहे. तसेच एआय चॅटबॉटच्या माध्यमातून अर्जदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पडताळणीसाठी सुनावणी आवश्यक असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ती घेण्याची सुविधाही उपलब्ध असेल. मंजूर झालेले प्रमाणपत्र ईमेल आणि व्हॉट्सअॅपवर पाठवण्याची योजना आहे.
ऑनलाइन अर्जाची प्राथमिक तांत्रिक तपासणी झाल्यानंतर समितीकडून कागदपत्रे आणि पुराव्यांची पडताळणी केली जाईल. गरज पडल्यास संबंधित यंत्रणांमार्फत चौकशी केली जाऊ शकते. समितीने शक्यतो 60 दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश आहेत. अर्जात त्रुटी आढळल्यास ऑनलाइन सूचना दिल्या जातील. आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम सुनावणीची संधीही मिळेल. अर्जदाराला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी दिल्याशिवाय दावा अवैध ठरवता येणार नाही.






