पुणे : ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेतील युजीनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याने 88.१३ मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदकावर नाव कोरलं आहे.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने सिल्वर मेडलची कमाई केली आहे. अवघ्या काही पॉईंट्सने त्याचं सुवर्ण पदक हुकलं आहे. संपूर्ण भारताची त्याच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. मात्र नीरजला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं आहे. २४ वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता.
नीरजचा फालाफेक
नीरजचा पहिला थ्रो- फाऊल
नीरजचा दुसरा थ्रो- 82.39 मीटर
नीरजचा तिसरा थ्रो- 86.37 मीटर
नीरजचा चौथा थ्रो- 88.13 मीटर
नीरजचा पाचवा आणि सहावा थ्रो- फाऊल
जागतिक क्रमांक- १ भालाफेकपटू अँडरसनने पात्रता फेरीत 89.91 मीटर अंतरावरून भालाफेक करून अंतिम फेरी गाठली. तो क्रमवारीत पहिला होता तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नीरजने पात्रता फेरीत 88.39 मीटर अंतरावर भालाफेक केली. अशा परिस्थितीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नीरजला या अंतिम फेरीत अँडरसनला हरवण्यासाठी ९० मीटर अंतरावर भालाफेक करावी लागणार होती, मात्र ते शक्य झालं नाही.
दुसरीकडे भारताचा दुसरा भालाफेकपटू रोहित यादवने पहिल्या प्रयत्नात ७८.५ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ७७.९६ तर तिसऱ्या प्रयत्नात ७८.५ मीटर भाला फेक करून आठव्या स्थानावर होता. तर नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर भालाफेक करत पदकांच्या शर्यतीत आपली दावेदारी रौप्य पदकावर सांगितली. मात्र ९० मीटर मार्क पार करण्याच्या नीरजच्या प्रयत्नाला पाचव्या फेरीत मोठा धक्का लागला. त्याचा पाचवा प्रयत्न अवैध ठरला. त्यामुळे आता त्याच्याकडे फक्त ६ वा आणि शेवटचा प्रयत्न शिल्लक होता.