पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय 36 वी मॅरेथॉन रविवार( 4 डिसेंबर)आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनच्या पूर्वतयारीची माहिती आज पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यात सुमारे 15 हजारहून अधिक महिला व पुरुष धावपटूंचा सहभाग यंदा या मॅरेथॉनमध्ये असेल. 80 हून अधिक परदेशी महिला व पुरुष धावपटूंचा देखील सहभाग अपेक्षित आहे, अशी माहिती छाजेड यांनीदिली. 42 किलोमीटरच्या या मॅरेथॉनमधील विजेत्या धावपटूंना पुणे महापालिकेतर्फे 35 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यंदाच्या मॅरेथॉनच्या टी-शर्टचे अनावरण पुण्याचे ज्येष्ठ ऑलिंपिक धावपटू बाळकृष्ण अक्कोटकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. गुरुवार 1 डिसेंबर पासून परदेशी धावपटूंचे आगमन होण्यास सुरुवात होणार आहे. 1 डिसेंबर पासून 3 डिसेंबर दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत सहभागी धावपटूंना मॅरेथॉन किट देण्यात येणार आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर क्रमांक 108 यंत्रणेतील 15 अॅम्ब्युलन्स, सुमारे 200 डॉक्टर्स, 200 अधिक नर्सेस यांचा समावेश असेल.
यामध्ये संचेती हॉस्पिटल, सिम्बॉयोसीस, काशीबाई नवले फिजिओथेरपी सेंटर, भारती विद्यापीठ, चखढ कॉलेज ऑफ नर्सेस यांचा मोठा सहयोग लाभला आहे. अनेक स्पेशलिस्ट डॉक्टर्सही यामध्ये सहभागी असून, त्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश आहे. सणस गाऊंड येथे 1 डिसेंबरपासून मिनी हॉस्पिटल्स व फिजीओ थेरपी सेंटर उभारले जाणार आहेत.