हर्षल देशपांडे
मुंबई : इंग्लंडने पाकिस्तान संघाला पराभूत कराताना दुसऱ्यांदा विश्वकरंडक उंचावला. या संपूर्ण स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने समोरच्या फलंदाजाला धडकी भरवणाऱ्या इंग्लंड संघाच्या सॅम करनला अंतिम लढतीतील सामनावीर व मालीकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सॅम करनने ६ लढतीमध्ये २२. षटकांत ११.३८ च्या सरासरीने १३ गडी बाद केले.
या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अनेक नवीन विक्रम प्रस्थापित झाले. फलंदाजीत भारताच्या विराट कोहलीने ९८.६७ च्या सरासरीने २९६ धावांचा रतीब घातला. त्यापाठोपाठ नेदरलँडच्या मॅक्स ओदाऊडने ८ लढतीत २४२ धावा करताना दुसरे तर भारताच्या सूर्यकुमार यादवने २३९ धावा करताना तिसरे स्थान राखले.
या स्पर्धेत केवळ दोनच खेळाडूंना शतकी खेळी करता आली. यात दक्षिण आफ्रिकेच्या रिली रूसोव्हने बंगलादेशच्या विरोधात खेळताना ५६ चेंडूत १०९ धावांची वादळी खेळी केली. तर न्यूझीलंडच्या ग्लेन फिलीपने श्रीलंकेविरुद्ध खेळताना ६४ चेंडूत १०४ धावा तडकावल्या. सर्वाधिक अर्धशतके देखील विराट कोहलीच्या नावावर जमा झाली. कोहलीने ४, सूर्यकुमार यादवने ३ तर नेदरलँडच्या मॅक्स ओदाऊडने २ अर्धशतके लगावली.
या स्पर्धेत भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव चांगलाच झळकला. त्याने १८९.६८ च्या स्ट्राईक रेटने २३९ धावा केल्या. न्यूझीलंडच्या फिन अॅलनने १८६.२७ च्या स्ट्राईक रेटने दुसरा तर अफगाणिस्तानच्या रशीद खानने १७८.१२ चा स्ट्राईक रेट राखताना तिसरा क्रमांक राखला. झिम्बाबे संघाच्या सिकंदर रझाने ११ षटकार मारताना पहिले, श्रीलंकेच्या कुसल मेंडिस व इंग्लंडचा अलेक्स हेक्सने १० षटकार मारताना दुसरे तर सूर्यकुमार यादवने ९ षटकार लागवताना तिसरे स्थान राखले.
या स्पर्धेत गोलंदाजांनी देखील कमाल करताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले. श्रीलंकेच्या वनिंदूं हंसरंगाने १५ गडी बाद करताना अग्रस्थान मिळविले. इंग्लंडचा सॅम करन व नेदरलँडच्या बास डी लिइडेने यांनी संयुक्तरित्या प्रत्येकी १२ गडी बाद करताना दुसरे स्थान राखले. सॅम करनने अफगाणिस्तान विरुद्ध १० धावत ५ गडी बाद करत स्पर्धेतील सर्वोत्तम स्पेल टाकला.
फलंदाजीतील अनेक आकडे भारताच्या खेळाडूंनी भरलेले असले तरी गोलंदाजी विभागात कोणत्याही भारतीय गोलंदाजाला महत्वपूर्ण स्थान मिळविता आले नाही. हीच कमतरता उपांत्य फेरीत देखील दिसल्यामुळे भारताला उपांत्य फेरीतून बाहेर पडावे लागले.