लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाचा विद्यार्थी कमलेश विजय सकट याने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या विभागीय वुशू स्पर्धेत (बॉक्सिंग, जुडो आणि कुस्ती या तीन खेळ प्रकारातून तयार झालेला खेळ) सुवर्णपदक पटकाविले आहे.
पुणे विभागीय शालेय वुशू स्पर्धा २०२३-२४ क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा वुशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगदंबा लॉन्स, जामखेड येथे २० व २१ ऑगस्टला या स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये रॉयल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली.
पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कॉलेज लोणी काळभोर येथील मोहिनी व्यंकटी धनगरे हिने ३६ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकाविले. एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथील कमलेश विजय सकट याने ४८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकाविले. तर लोणी काळभोर येथील एंजल हायस्कुल एंड ज्युनियर कॉलेज येथील अनिकेत संदीप काळभोर याने देखील ५६ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकाविले.
साने गुरुजी हायस्कूल हडपसर येथील रुद्राक्ष वाघेश्वर पाटील याने ५२ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवत सिल्वर मेडल पटकाविले आहे. लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या तीन विद्यार्थिनीनि चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये विद्यार्थिनी प्रतीक्षा व्यंकटी धनगरे हिने ४० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवत सिल्वर मेडल पटकाविले. तसेच अनुष्का रामदास काळभोर हिने ४५ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवत ब्रॉझ मेडल पटकाविले. सिद्धि अविनाश काळभोर हिने ३६ किलो वजनी गटात पाचवा क्रमांक पटकाविला.
दरम्यान, या सर्व खेळाडूंना सुरज उकिरडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत अमरावती येथे निवड झाली आहे.