चंदीगड: भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेदरम्यान एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. 23 वर्षांखालील खेळाडूंच्या किट बॅगमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. यानंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. आता या खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई होणार हे निश्चित आहे.
चंदीगड विमानतळावर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाकडून 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बॉक्स आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाच्या पाच क्रिकेटपटूंच्या किटमध्ये दारूच्या बाटल्या आणि बिअर सापडल्या आहेत. हे सर्व खेळाडू सीके नायडू ट्रॉफीमधील सौराष्ट्रच्या 23 वर्षांखालील संघातील आहेत.
सीके नायडू ट्रॉफीमध्ये 25 जानेवारीला झालेल्या चंदीगड- सौराष्ट्र सामन्यात यजमान चंदीगडचा पराभव सौराष्ट्रने केला. यानंतर सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परतत असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी खेळाडूंच्या किटची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर जे काही घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे. सौराष्ट्रातील 5 क्रिकेटपटूंकडे 27 दारूच्या बाटल्या आणि 2 बिअरच्या बाटल्या सापडल्या. अजून या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या घटनेने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
या सर्व प्रकारानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चंदीगडमध्ये एक कथित घटना घडली आहे, जी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निदर्शनास आणून दिली आहे. ही घटना दुर्दैवी आणि असह्य आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची शिस्तपालन समिती आणि सर्वोच्च परिषद या घटनेची सखोल चौकशी करेल आणि योग्य शिस्तभंगाची कारवाई करेल, असंही या निवेदनात म्हटलं आहे.