पुणे: स्वप्नील कुसाळे…हे नाव भारतीय क्रीडा इतिहासात अजरामर झाले आहे. स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक अशी कामगिरी केली आहे, जी आजपर्यंत कोणत्याही भारतीयाला करता आली नाही. महाराष्ट्राच्या या नेमबाजाने पॅरिसमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. त्याला ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये हे पदक मिळाले. पात्रता फेरीमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या स्वप्नीलने ४५१.४ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. आज देश स्वप्नील स्वप्नील कुसाळे सलाम करत आह. पण हे यश मिळवण्यासाठी या खेळाडूने खूप कष्ट घेतले आहेत.
स्वप्नील कुसाळे यांचा संघर्ष
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी स्वप्नील कुसाळेने तब्बल १२ वर्षे वाट पाहिली आहे. हा खेळाडू 2012 पासून व्यावसायिकपणे नेमबाजी करत आहे. मात्र, गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये तो पात्र ठरू शकला नाही. परंतु, या खेळाडूने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर या खेळाडूला यश मिळाले. कुसाळे गेल्या 10-12 वर्षांपासून घरापासून दूर असून नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी त्याने हे सर्व केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वप्नीलच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कुटुंबापासून दूर राहतो. ते कोणीही अंतिम सामन्यापूर्वी स्वप्नीलशी फोनवर बोलले नाही.
स्वप्नील कुसाळे हा धोनीचा एकलव्य
स्वप्नील कुसाळेची रंजक गोष्ट म्हणजे तो धोनीचा मोठा चाहता आहे. त्याने सांगितले की, शूटिंगमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याने धोनीकडून प्रेरणा घेतली आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, तो नेमबाजीमध्ये कोणत्याही विशिष्ट खेळाडूचे मार्गदर्शन घेत नाही. पण, इतर खेळांमध्ये धोनी हा त्याचा आवडता आहे. शूटिंग करताना शांत राहणे महत्त्वाचे असते आणि त्यामुळे धोनीचा हा गुण त्याला खूप आवडला. मोठी गोष्ट म्हणजे धोनीनेही आपल्या करिअरची सुरुवात रेल्वेत टीसी म्हणून केली होती आणि कुसाळे हा देखील मध्य रेल्वेत टीसी म्हणून कार्यरत आहे. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी कुसाळेने मनू भाकरकडून प्रेरणा घेतली. मनू भाकर हिला पाहून त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, मनू जिंकू शकते, तर तोही जिंकू शकतो आणि तसेच झाले.