मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आहेत. भारतीय संघ 10 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2014 मध्ये भारताने शेवटची T20 फायनल गाठली होती, जेव्हा त्यांना श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी T20 विश्वचषक सामना (T20 World Cup 2024) अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेला. एकूण 20 संघांनी सहभाग घेतला. सर्वांना हरवून भारत आणि दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठली.
यावेळी सर्वाधिक बक्षीस रक्कम किती ?
T20 विश्वचषक हा अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. उदाहरणार्थ, आतापर्यंत खेळलेल्या सर्व T20 विश्वचषकांच्या तुलनेत यावेळी सर्वाधिक बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. आयसीसीनुसार, T20 विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीसाठी एकूण 11.25 दशलक्ष यूएस डॉलर निधीची तरतूद करण्यात आली आहे. जर आपण रुपयात बोललो तर ही रक्कम सुमारे 93.80 कोटी रुपये आहे.
T20 विश्वचषक विजेत्याला काय मिळेल?
T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकणाऱ्या संघाला 2.45 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 20.42 कोटी मिळतील. याशिवाय विजेत्यांना चमकदार ट्रॉफीही मिळेल.
T20 विश्वचषक उपविजेत्याला काय मिळणार?
दुसरीकडे उपविजेत्या संघासाठी मोठी बक्षीस रक्कमही निश्चित करण्यात आली आहे. विश्वचषक गमावणाऱ्या संघाला10.67 कोटी रुपये मिळतील. विजेत्या संघाच्या तुलनेत ही रक्कम जवळपास निम्मी आहे.