आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावापूर्वी केएल राहुलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून, लखनऊ सुपर जायंट्सचा संघ केएल राहुलला रिटेन करणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, केएल राहुलने स्वत:हुन या संघाकडून खेळण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला मोठी रक्कम देऊन रिटेन करण्याचा प्लान केला होता. मात्र त्याने स्वतःहून ही ऑफर फेटाळून लावली आहे.
राहुलने फेटाळून लावली ऑफर..
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलने आगामी हंगामात लखनऊ सुपर जांयट्स संघाकडून खेळण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरु होती की, राहुलची स्लो फलंदाजी पाहून लखनऊचा संघ त्याला रिलीझ करणार आहे. आता लेटेस्ट अपडेटनुसार, लखनऊचा संघ त्याला १८ कोटी रुपये देणार होता.परंतु, राहुलने वैयक्तिक आणि प्रोफेशनल कारणामुळे लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
‘या’ संघांकडून मोठी ऑफर..
माध्यमातील एका वृत्तानुसार, केएल राहुलने लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडण्याची तयारी केली आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. यापूर्वी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यावेळी त्याने दमदार कामगिरी केली होती. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघानेही त्याला आपल्या संघात घेण्यात रस दाखवला असून या दोन्ही संघांसह राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचा संघ देखील त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.
संघमालकांसोबत झाला होता वाद
मागच्या हंगामामध्ये केएल राहुल हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार होता. या हंगामातील शेवटच्या सामन्यात केएल राहुल आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.