मुंबई : मंगळवारी ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात १९ धावा देऊन ६ गडी बाद केले. या कामगिरीमुळे ७१८ गुणांसह जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. न्यूझीलंडचा ट्रेंड बोल्ट आणि पाकिस्तानचा शाहिन अफ्रिदीला मागे टाकत प्रथम स्थान पटकावलं आहे. जसप्रीत बुमराह दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यात जगातील नंबर- १ गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी तो चौथ्या स्थानावर होता.
बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तसेच बुमराहची 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बुमराह इंग्लंडमध्ये 6 विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.
दरम्यान, याआधी बुमराह टी-20 चा नंबर-1 गोलंदाजही राहिला आहे. कसोटी क्रमवारीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा हे देखील वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.