पुणे: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) आगामी हंगामापूर्वी क्रिकेट वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा ‘ट्रेड’ यशस्वी झाला असून, संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) ‘येलो जर्सी’मध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे, चेन्नईने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या बदल्यात संजूला आपल्या संघात स्थान दिले आहे. या ऐतिहासिक बदलानंतर संजू सॅमसनच चेन्नईचा नवा कर्णधार होणार का? या चर्चेला आता उधाण आले आहे.

महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन हंगामात चेन्नईला अपेक्षित यश मिळाले नाही. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली संघाला प्ले-ऑफपर्यंत पोहोचण्यातही अपयश आले. धोनीचा वारसदार म्हणून एका अनुभवी आणि ‘मॅच विनर’ खेळाडूची चेन्नईला गरज होती. अशातच संजू सॅमसनसारखा खेळाडू संघात आल्याने चेन्नईची बाजू अधिक भक्कम झाली आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमात संजूला चेन्नईच्या कर्णधारपदाबाबत विचारले असता संजू म्हणाला, “चेन्नई सुपर किंग्जमध्ये मला ‘हेड्स आणि टेल्स’ (नाणेफेक) करण्याची गरज नाही. कारण तिथे फक्त एकच ‘हेड’ आहे आणि ते म्हणजे एमएस धोनी. माझे मुख्य ध्येय टीम मॅनेजमेंट आणि ‘माही भाई’ने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे हेच आहे.”






