पुणे : आशिया स्पर्धेत भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. दुबळ्या हॉंगकॉंगचा टीम इंडियाने ४० धावांनी धुव्वा उडवला आहे. सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हॉंगकॉंगसमोर १९३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय वेगवान माऱ्यासमोर हॉंगकॉंगचा संघ २० षटकात १५२ धावाच करू शकला. भारताने सलग दुसरा विजय मिळवत सुपर ४ संघांमध्ये स्थान मिळवलं आहे.
सुर्यकुमार यादवने २६ बॉलमध्ये हे ६८ धावांची तुफानी खेळी केली आहे. या खेळीत त्याने ६ षटकार आणि ६ चौकार मारले आहेत. त्याआधी रोहित शर्मा २१ आणि के एल राहूलने ३६ धावा केल्या आहेत. या बळावर टीम इंडियाने २ विकेट गमावून १९२ धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँग संघाची दमछाक झाली.
सूर्यकुमार आणि विराट या जोडीने मात्र अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. मुंबईकर सूर्यकुमारने मैदानाच्या चारही कोपऱ्यांत फटके मारण्याचे कसब पुन्हा सिद्ध केले. त्याने २६ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. त्याला विराटची तोलामोलाची साथ लाभली. विराटने सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. परंतु, अखेरच्या काही षटकांत त्याने धावांची गती वाढवली. अखेरीस त्याने ४४ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५९ धावांची केली. सूर्यकुमार-विराट जोडीने सात षटकांतच ९८ धावांची भर घातली.
त्यानंतर १९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या हाँगकाँगला २० षटकांत ५ बाद १५२ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून बाबर हयात (३५ चेंडूंत ४१), किंचित शहा (२८ चेंडूंत ३०) आणि झीशान अली (१७ चेंडूंत नाबाद २६) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, मधल्या षटकांत त्यांना वेगाने धावा न करता आल्याने त्यांचा पराभव झाला.