पुणे : सुर्यकुमार यादव व केएल राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सर्वच भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विजयासाठी मिळालेले १०७ धावांचे आव्हान भारताने दोन गडी गमावत गाठले. धारदार गोलंदाजी करणारा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सामन्याचा मानकरी ठरला.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतलेला निर्णय दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी सार्थ ठरवला. त्यांनी अवघ्या २.३ षटकात दक्षिण आफ्रिकेचे पहिले पाच गडी बाद केले. त्यानंतर ऐडन मार्करम व वेन पार्नेल यांनी संघाचा डाव सावरला मार्करम २५ व पार्णेल २४ धावा करत बाद झाले.
केशव महाराजने एक बाजू लढवत ठेवत त्याने ३५ चेंडूत ४१ धावा केल्या. भारतासाठी अर्शदीपने सर्वाधिक तीन बळी मिळवले. विजयासाठी मिळालेल्या १०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्मा खातेही न खोलता तंबूत परतला तर विराट कोहली ३ धावा करून माघारी परतला.
दरम्यान, सूर्यकुमार यादवने आल्या आल्या दोन षटकार ठोकत पटकन धावगती वाढवली. दोघांनीही भारताचा विजय आवाक्यात आणला. सूर्यकुमारने यादरम्यान आपले ८ वे अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस राहुलने विजयी षटकारासह अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.