जोहान्सबर्ग: येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. पुन्हा एकदा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा कहर पाहायला मिळाला. त्याने झंझावाती शतकी खेळी केली. सूर्यासोबत यशस्वी जैस्वालनेही स्टाईलमध्ये अर्धशतक झळकावले.
तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना टीम इंडियासाठी करा किंवा मरोचा आहे. ०-१ ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत.
केशव महाराजने तिसर्याच षटकातच घेतले दोन बळी:
सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामी जोडीने दमदार सुरुवात करत पहिल्या दोन षटकात 29 धावा केल्या. या एकूण धावसंख्येवर शुभमन गिल (12) पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला केशव महाराजने एलबीडब्ल्यू केले. यानंतर लगेचच केशव महाराजनेही पुढच्याच चेंडूवर टिळक वर्माला (0) बाद केले. अशाप्रकारे भारतीय संघाने 2.3 षटकांत 29 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या.
सूर्या आणि यशस्वीची स्फोटक भागीदारी :
कर्णधार सूर्यकुमार यादवने यशस्वी जैस्वालच्या साथीने भारतीय संघाला पुन्हा रुळावर आणले. दोन विकेट पडल्यानंतरही हे दोन्ही फलंदाज चौकार आणि षटकार मारण्यास घाबरले नाहीत. दोघांमध्ये 69 चेंडूत 112 धावांची भक्कम भागीदारी झाली. एकूण 141 धावांवर 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी बाद झाला. त्याने 41 चेंडूत 60 धावा केल्या.
त्यानंतर सूर्याने रिंकू सिंगसह डाव पुढे नेला. दोघांमध्ये 27 चेंडूत 47 धावांची भागीदारी झाली. येथे रिंकू सिंग 10 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले आणि ५६व्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकार मारले.
शेवटच्या षटकात तीन विकेट:
20व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सूर्या बाद झाला. त्याच षटकात रवींद्र जडेजा (4) धावबाद झाला आणि जितेश शर्माला (4) हिट विकेट बाद आली. अशाप्रकारे भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 201 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि लिझार्ड विल्यम्सने २-२ बळी घेतले. नांद्रे बर्जर आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.