पुणे : टीम इंडियाने आशिया कपमध्ये दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट राखून पराभव केला. पण आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यासाठी आता या स्पर्धेचे नियम पाहणे गरजेचे आहे.
यावर्षी आशिया चषक स्पर्धेत महत्वाचे बदल करण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी दोन गट बनवण्यात आले आहे. या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला एकमेकांबरोबर खेळण्याची संधी मिळेल. या साखळी फेरीनंतर सुपर-४ ही फेरी खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत जे दोन संघ जास्त विजय मिळवतील किंवा तिन्ही संघांनी जर प्रत्येकी एक विजय मिळवला तर रनरेटनुसार हा निर्णय घेण्यात येईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा कसा होऊ शकतो, जाणून घ्या कसे…!
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ‘अ’ गटात आहेत. त्यामुळे या गटातील दोन संघ पुन्हा सुपर -४ या फेरीत खेळू शकतील. या गटातील पहिला सामना हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता. हा सामना भारताने जिंकला. त्यामुळे सुपर-४ या फेरीसाठी भारताने आपली दावेदारी सिद्ध केली आहे. आता भारताचा दुसरा सामना हा हाँगकाँगबरोबर ३१ ऑगस्टला होणार आहे.
हा सामना भारताने जिंकला तर ते सुपर – ४ या फेरीत पोहोचतील. त्यानंतर पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यामध्ये जो विजयी ठरेल त्याला सुपर – ४ या फेरीत पोहोचता येणार आहे. हाँगकाँग विरुद्ध पाकिस्तान हा सामना जिंकून सुपर – ४ या फेरीत पोहोचू शकतो. पण जर हाँगकाँगने पाकिस्तानला धक्का दिला तर मात्र पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून बाहेरहि होऊ शकतो. त्यामुळे आता सर्व समीकरण हे पाकिस्तानच्या सामन्यावर अवलंबून असतील. त्यामुळे आता या सामन्यात काय घडतं, हे सर्वात महत्वाचं असेल आणि त्याची सर्वांना उत्सुकता असेल. त्यामुळे या सर्व सामन्यांवर चाहत्यांचे लक्ष आहे.