नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला आहे. राजकोटमध्ये त्यांनी इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. कसोटी इतिहासातील धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे.
हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली. तर, विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली . तिसऱ्या सामन्यातील आजच्या विजयात भारतासाठी यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा यांनी मोलाचे योगदान दिले. सामन्यात इंग्लंडला ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा संघ १२२ धावांवर गारद केला. आता मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गारद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी होती. यानंतर भारताने दुसरऱ्या डावात ४ बाद ४३० धावा केल्या. त्यामुळे एकूण आघाडी ५५६ धावांची झाली. ज्यामुळे इंग्लंडला ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. तसेच बुमराह आणि अश्विनने एक विकेट घेतली. तर, मार्क वुड वगळता इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. वुडने १५ चेंडूत ३३ धावा केल्या. तर भारताकडून रवींद्र जडेजाने चांगली कामगिरी करत पाच विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीपला दोन बळी मिळाले. बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट घेतल्या आहे.
रवींद्र जडेजा ठरला सामनावीर
तिसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात ११२ धावांची खेळी साकारली. त्याशिवाय पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या.
गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर
इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताचे सात सामन्यांतून ५० गुण झाले आहेत. भारताची गुणांची टक्केवारी ५९.५२ वर पोहोचली आहे. भारताने ५५ टक्के गुण मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकले. भारत आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.