पुणे प्राईम न्युज: भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत बांगलादेशचा नऊ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे टीम इंडियाचे किमान रौप्य पदक निश्चित झाले आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोघांमधील विजेत्याशी होईल.
या सामन्यात भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांची पहिली विकेट 18 धावांवर पडली. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिल्याने त्यांना २० षटकांत केवळ 96 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशकडून झाकीर अलीने सर्वाधिक नाबाद 24 धावा केल्या. परवेझ हुसेनने 23 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय फक्त रकीबुल हसन (14 धावा) दुहेरी आकडा पार करू शकला. बांगलादेशचे सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. दोन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारताकडून आर साई किशोरने १२ धावांत ३ बळी घेतले तर वॉशिंग्टन सुंदरने १५ धावांत २ बळी टिपले.
A formidable 9️⃣-wicket win over Bangladesh and #TeamIndia are through to the #AsianGames Final! ????????????????
Scorecard ▶️ https://t.co/75NYqhTEac#IndiaAtAG22 pic.twitter.com/SsRVenSNmu
— BCCI (@BCCI) October 6, 2023
97 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचीही सुरुवात खूपच खराब झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल खाते न उघडता बाद झाला. मात्र, त्यानंतर तिलक वर्माने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या साथीने नाबाद विजयी भागीदारी केली. तिलक वर्माने २६ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत २ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. ऋतुराजनेही नाबाद ४० धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.