मुंबई : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले १११ धांवांचं आव्हान टीम इंडियाने एकही विकेट न गमावता १८.४ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने टीम इंडियाला विजयश्री मिळवून दिली. यासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
रोहित शर्माने नाबाद ७६ धावा केल्या यामध्ये रोहितने ६ चौकार आणि ५ खणखणीत षटकार ठोकले. तर शिखर धवनने नाबाद ३१ धावांची संयमी खेळी करत रोहितला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने १९ धावात ६ तर मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडने गुडघे टेकले. बुमराहने इंग्लंडच्या ६ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे बुमराहने ६ पैकी ३ फलंदाजांना शून्यावर बाद केलं. मोहम्मद शमीने ३ आणि प्रसिद्ध कृष्णाने १ विकेट घेत निर्णायक भूमिका बजावली. या दोघांनी बुमराहला दिलेल्या साथमुळे इंग्लंडला लवकर आटोपण्यात यश आलं.
दरम्यान या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा १४ जुलैला खेळवण्यात येणार आहे. हा दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे.