पुणे : भारताने वेस्ट इंडीजला चौथ्या टी 20 सामन्यात ५९ धावांनी मात देत मालिकेत ३ -१ अशी विजयी आघाडी घेतली. भारताने वेस्ट इंडीज समोर विजयासाठी १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र विंडीजचा संघ १३२ धावात ढेर झाला.
मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला. पण येथे वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १९१ धावा केल्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला १३२ धावा करता आल्या.
वेस्ट इंडिजकडून रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी २४-२४ धावा केल्या, तर उर्वरित फलंदाजी अपयशी ठरली. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, आवेश खान-अक्षर पटेल-रवी बिश्नोईने २-२ बळी घेतले.
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १९१ धावा केल्या होत्या. ऋषभ पंतने टीम इंडियासाठी ४४ धावांची इनिंग खेळली, त्याने आपल्या इनिंगमध्ये ६ चौकार मारले. त्यांच्याशिवाय संजू सॅमसननेही अखेरीस ३० धावांची जलद खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी या सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून दिली. रोहित शर्माने अवघ्या १६ चेंडूत ३३ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत २४ धावा केल्या.