बेंगळुरू: बेंगळुरू कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पहिला डाव 46 धावांवर आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय चुकीचा ठरला. ढगाळ वातावरणात टीम इंडियाचा डाव पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळला. पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने १३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दोन धावा, तर जसप्रीत बुमराह एक धाव काढून बाद झाला.
46 धावा ही भारतातील कोणत्याही संघाची कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडच्या नावावर असलेला रेकॉर्ड मोडला. 2021 मध्ये वानखेडेवर किवी संघ 62 धावांत गारद झाला होता. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात खराब कामगिरी आहे. 37 वर्षांपूर्वी म्हणजेच 1987 मध्ये दिल्लीत भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 75 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही सर्वात खराब धावसंख्या आहे. यापूर्वी 1976 मध्ये टीम इंडियाने वेलिंग्टनमध्ये किवीजविरुद्ध 81 धावा केल्या होत्या. ही भारताची कसोटीतील तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2020 मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ 36 धावांवर बाद झाला होता. त्याच वेळी, 1974 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया 42 धावांवर ऑलआऊट झाली होती.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. बुधवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. गुरुवारी दुसऱ्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माच्या या निर्णयाचा किमान सुरुवातीच्या तासात उलटसुलट परिणाम झाला. भारताने पहिल्या तासातच रोहित शर्मा, विराट कोहली आणि सरफराज खानच्या विकेट्स गमावल्या.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा 2 धावा करून बाद झाला. विराट कोहली आणि सर्फराज खान यांना खातेही उघडता आले नाही. भारतीय क्रिकेट संघाची घरच्या मैदानावर ही सर्वात वाईट सुरुवात आहे. भारताने याआधी 2010 मध्ये घरच्या मैदानावर 10 पेक्षा कमी धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. 2010 साली अहमदाबाद कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताच्या 3 विकेट्स फक्त 2 धावांत घेतल्या होत्या.