चेन्नई: रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दमदार कामगिरी करत बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक झळकावले. अश्विनने अप्रतिम खेळी केली आहे. त्याने रवींद्र जडेजासोबत 180 हून अधिक धावांची भागीदारीही पूर्ण केली. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मात्र यानंतर जडेजा आणि अश्विनने डावाची धुरा सांभाळली आणि टीम इंडियाच्या धावसंख्येने पहिल्या डावात 300 धावांचा टप्पा पार केला. अश्विनचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे.
बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अश्विन भारताकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तर जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दमदार फलंदाजी करत अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी त्याचे वडीलही चेपॉक स्टेडियमवर पोहोचले होते. अश्विनने 108 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. अश्विनच्या कारकिर्दीतील हे सहावे कसोटी शतक आहे.
अश्विनची डॅनियल व्हिटोरीशी बरोबरी –
अश्विनने व्हिटोरीची बरोबरी केली आहे. कसोटीत ८व्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. अश्विन आणि व्हिटोरी यांनी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 4-4 शतके झळकावली आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन शतके झळकावली आहेत.
जडेजा-अश्विनची मजबूत भागीदारी –
टीम इंडियाने 78 षटकांत 6 विकेट गमावून 334 धावा केल्या होत्या. यावेळी जडेजा 117 चेंडूत 86 धावा करून खेळत होता. त्याने अश्विनसोबत 195 धावांची भागीदारी पूर्ण केली. जडेजा आणि अश्विनच्या या भागीदारीने अनेक विक्रम मोडीत काढले.
खराब सुरुवातीनंतर टीम इंडियाचे पुनरागमन –
भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 6 धावा करून बाद झाला. शुभमन गिल शून्यावर बाद झाला. तर विराट कोहली केवळ 6 धावा करून बाद झाला. ऋषभ पंतने 52 चेंडूत 39 धावा केल्या. तर केएल राहुल 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावले. त्याने 118 चेंडूंचा सामना करत 56 धावा केल्या. यशस्वीने 9 चौकार मारले.