पुणे : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत अडीच दिवसात भारतावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. पहिल्या दोन कसोटीत हार पत्करलेला ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक करताना ९ विकेट्सने इंदूर कसोटी जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-२ अशी पिछाड़ी कमी केली. भारताचे ७६ धावांचे लक्ष्य ऑसींनी सहज पार केले.
या विजयामुळे ऑस्ट्रेलिया लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी भारताला मालिकेतील उर्वरित एक सामना जिंकणे अनिवार्य आहे.
भारताकडून चैतेश्वर पुजाराने (५९) एकमेव अर्धशतक झळकावले. गुरुवारी सकाळी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांत गुंडाळला. यासह मोठी आघाडी घेण्यास कांगारूंना अपयश आले. ८८ धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. उपाहारापर्यंत भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता १३ धावा केल्या. उपाहारानंतर पहिल्याच षटकात नॅथन लायनने शुभमन गिलला (5) क्लीन बोल्ड करून भारताला पहिला धक्का दिला. तर, कर्णधार रोहित शर्माने (१२) आपली विकेट स्वस्तात दिली. तो लायनच्या गोलंदाजीवर पायचित झाला. यानंतर विराट कोहलीही काही खास करू शकला नाही आणि मॅथ्यू कुहेनमनच्या चेंडूवर तोही पायचित झाला.
रवींद्र जडेजा सात धावा करून लायनचा बळी ठरला. यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमण हाच बचाव हा पवित्रा स्वीकारला आणि लायनवर हल्ला चढवला. त्यामुळे कर्णधार स्मिथने मिशेल स्टार्कला गोलंदाजीस आणले. त्याचा हा डाव यशस्वी ठरला, स्टार्कच्या चेंडूवर ख्वाजाकडे झेल देऊन त्याने आपली विकेट गमावली. श्रेयसने २७ चेंडूंत २६ धावा फटकावल्या.
लायनने के. एस. भरतला (३) क्लीन बोल्ड करून भारताला सहावा धक्का दिला. दरम्यान, पुजाराने कसोटी कारकिर्दीतील ३५ वे अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे १६ वे अर्धशतक ठरले, अश्विनला बाद करून लायनने २३ व्यांदा डावात पाच बळी घेण्याची कियमा केली. यानंतर बळींचा पटकार लगावत पुजाराला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले.
दरम्यान, पुजारा १४२ चेंडूंत ५९ धावांची लढाऊ खेळी करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. लायनने संघासाठी सुखद शेवट केला. त्याने उमेशला ग्रीनच्या हाती झेलबाद आणि सिराजचा त्रिफळा उडवून भारताचा डाव १६३ धावांवर गारद झाला.