मुंबई: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघाची जोरदार कामगिरी सुरूच आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंकेचा (IND vs SL) 302 धावांनी पराभव करून या विश्वचषकात सलग सातवा विजय नोंदवला. या विजयासह भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी फलंदाजीत तर मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. भारताने दिलेल्या 358 धावांच्या लक्ष्यासमोर श्रीलंकेचा संघ 19.4 षटकांत 55 धावांत गारद झाला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 तर मोहम्मद सिराजने 3 बळी घेतले. शमीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब
भारताने दिलेल्या 358 धावांच्या विशाल लक्ष्यासमोर श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. लंकेच्या संघाने एकूण ३७ धावांवर आपले ४ विकेट गमावले होते. जसप्रीत बुमराहने श्रीलंकेच्या डावातील पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सलामीवीर पथुम निसांकाला पायचीत करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर मोहम्मद सिराजची जादू चालली. सिराजने पहिल्या 7 चेंडूत एकही धाव न देता 3 बळी घेतले. त्याने दिमुथ करुणारत्नेला बाद करून श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.
लंकेच्या दोन्ही सलामीवीरांना खातेही उघडता आले नाही. सुरुवातीला श्रीलंकेने 3 च्या एकूण धावसंख्येवर आपले 4 विकेट गमावले होते. सिराजने सदिरा समरविक्रमाला खातेही उघडू दिले नाही. कर्णधार कुसल मेंडिसला सिराजच्या गोलंदाजीवर तर चरित असलंकाला शमीने जडेजाच्या हाती झेलबाद केले. शमीने दुषण हेमंताला राहुलकरवी झेलबाद केले.