IND vs SA T20: भारतीय संघ सध्या टी20 मालिकेसाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असून पहिल्याच टी20 सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनने तुफान शतकीय खेळी केली. संजू सॅमसनने 47 चेंडूत शतक पूर्ण केलं. तसेच 50 चेंडूत 10 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 107 धावा केल्या. संजू सॅमसनचं आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील सलग दुसरं शतक ठरलं आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात 40 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यामुळे संजू सॅमसन हा भारताचा नाही तर आशिया खंडातील टी20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं ठोकणारा फलंदाज ठरला आहे. या खेळीचं श्रेय संजू सॅमसनने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला दिलं आहे. या दोघांनी प्रोत्साहान दिल्याचं त्याने सामन्यानंतर सांगितलं.
प्रशिक्षक आणि कर्णधाराचे खूप सारे कॉल आले..
संजू सॅमसन हा श्रीलंका दौऱ्यामध्ये फेल गेला होता. तेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधाराचे खूप सारे कॉल आले होते. तसेच फिरकीचा सामना करण्यावर जोर देण्यास सांगितलं होतं, असं संजू सॅमसन बोलला. ‘अपयशात संवाद खूप महत्त्वाचा असतो. एक खेळाडू आपल्या खराब वेळेत हरवू शकतो. श्रीलंका मालिकेनंतर मला गौतमभाई आणि सूर्याचे खूप सारे कॉल आले. त्यात त्याने सांगितलं की मला कोणत्या गोष्टींवर काम करायचं आहे ते. त्यांनी सांगितलं की, फिरकीला खेळताना जरा अडचणीत येतो असं वाटते. त्यामुळे केरळमध्ये फिरकीपटूंना एकत्र कर आणि खडबडीत विकेटवर प्रॅक्टिस कर.’, असं संजू सॅमसनने सांगितलं.
संजू सॅमसनला टीम इंडियात असताना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याच्या खूपच कमी संधी मिळाल्या. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तर बेंचवर बसून राहिला होता. त्यानंतर थेट झिम्बाब्वे दौऱ्यात खेळला. मात्र श्रीलंका दौरा काही विशेष करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाबाहेर जाण्याची वेळ आली होती. मात्र बांग्लादेश मालिकेच्या शेवटच्या सामन्यात त्याला सूर गवसला. तर आता दक्षिण अफ्रिकेतही त्याने हा फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.
संजू सॅमसन पुढे म्हणाला की, ‘माझ्या कारकिर्दीत मला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले आहे. जेव्हा तुम्हाला वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा तुमच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. याशिवाय सोशल मीडियावर लोकांची टीका, शिवीगाळ यांचा सामना करावा लागतो. त्या टप्प्यावर मलाही प्रश्न पडत होते, की मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य खेळाडू नाही. मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत असताना, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी का करू शकलो नाही, असे अनेक विचार माझ्या मनात आले. पण बऱ्याच वर्षांच्या अनुभवानंतर मला आता कळले की माझ्यात काय क्षमता आहे.’