मुंबई: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाला आहे. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर ही धक्कादायक बातमी जाहीर केली. हार्दिक पांड्याने चाहत्यांना माहिती दिली की, तो त्याच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण करत आहे. हार्दिक आणि नताशा यांनी मिळून आता वेगळे व्हायचे ठरवले आहे. दोघांनी आपलं नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, शेवटी दोघांनीही एकमेकांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं हार्दिकने सांगितलं. हार्दिकने सांगितले की, घटस्फोटाचा निर्णय खूप कठीण होता. कारण त्यांनी एकत्र आनंद साजरा केला, चांगल्या-वाईट काळात एकमेकांना साथ दिली, ते एका कुटुंबासारखे जगले.
4 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांचा विवाह मे 2020 मध्ये झाला होता. लॉकडाऊनमध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. जुलै 2020 मध्ये दोघेही एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव अगस्त्य आहे. त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले.
आता मुलगा अगस्त्याचं काय होणार?
नताशा आणि हार्दिक यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पण यादरम्यान सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, त्यांचा मुलगा अगस्त्यचं काय होणार? यावर हार्दिक पांड्यानेही त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये उत्तर दिले आहे. हार्दिकने सांगितले की, तो आणि नताशा वेगळे झाले असले, तरी ते अगस्त्याला एकत्र वाढवतील. हार्दिकने त्याच्या चाहत्यांना आणि लोकांना या दुःखाच्या काळात त्याच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा आपल्या देशात सर्बियाला परतली आहे. हार्दिकचा मुलगा अगस्त्य यानेही आईसोबत देश सोडला आहे.