मुंबई: मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला 2024 च्या आधी संघाचा कर्णधार बनवले आहे. मुंबईने पांड्यासाठी गुजरात टायटन्सबरोबर ट्रेड केले होते . याआधी रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. रोहित दीर्घकाळ संघाचा कर्णधार राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा विजेतेपद पटकावले. मात्र, आता रोहितला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
मुंबईने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून पांड्याला कर्णधार बनवल्याची बातमी शेअर केली आहे. मुंबईने निवेदनात लिहिले की, ‘मुंबई इंडियन्स आज कर्णधार बदलाची घोषणा केली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या पुढच्या सत्रात कर्णधार असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत यश मिळवले आहे. टीमने लिहिले की, आमची टीम रोहित शर्माची आभारी आहे. 2013 पासून आतापर्यंतचा त्यांचा कार्यकाळ उत्कृष्ट राहिला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.
पांड्या याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजेतेपदही पटकावले आणि संघाने गेल्या मोसमात अंतिम फेरीही गाठली. हार्दिकची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर ती उत्कृष्ट राहिली आहे. पांड्याने आतापर्यंत 123 आयपीएल सामने खेळले आहेत. या कालावधीत 2309 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने 53 विकेट्सही घेतल्या आहेत. 17 धावांत 3 बळी घेणे ही हार्दिकची आयपीएल सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेत त्याने 10 अर्धशतकेही झळकावली आहेत.
रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ पाच वेळा चॅम्पियन बनला. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले. रोहितची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर तीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 243 सामन्यात 6211 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि 42 अर्धशतके केली आहेत. रोहितने एप्रिल 2008 मध्ये करिअरचा पहिला आयपीएल सामना खेळला. डेकर चार्जेसकडून खेळताना रोहितने पदार्पण केले.