मुलतान : पाकिस्तान दौऱ्यावर असणारा इंग्लंड संघ तीन कसोटी लढतींची मालिका खेळणार आहे. मुलतान येथे उद्या शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या कसोटी लढतीपूर्वीच खेळाडू राहात असलेल्या हॉटेलच्या जवळ गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. यापूर्वी देखील श्रीलंका क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला असताना दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे अनेक देशांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे व पाकिस्तनचा दौरा करणे स्थगित केले होते. परंतु मागील काही वर्षांपासून काही संघांनी पाकिस्तानमध्ये दौरा करण्यास सुरुवात केली होती. सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना खेळाडू राहत असलेल्या हॉटेल जवळ गोळीबार करण्यात आल्याने पुन्हा एकदा क्रीडाविश्व हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुलतान येथे दोन टोळ्यांमध्ये गॅंगवार झाले असून ही घटना खेळाडू राहात असलेल्या हॉटेलच्या शेजारी झाली आहे. पाकिस्तान पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून खेळाडूंना अजून कडक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या घटनेचा इंग्लंड दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पाकिस्तान सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असून सामान नियोजित वेळापत्रकानुसार खेळविण्यात येणार आहे.
यापूर्वी न्यूझीलंड संघ पाकिस्ताना येथे खेळण्यासाठी आला होता. मात्र न्यूझीलंड क्रिकेट संघाला ईमेल द्वारे धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंड संघ एकही सामना न खेळाता परत गेला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.