मुंबई: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरोधात शनिवारी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, रॉबिन हा कपड्यांचे उत्पादन करणारी कंपनी सेंचुरीज लाइफ स्टाईल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेडचा भागीदार आणि व्यवस्थापक आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापण्यात आला, मात्र तो खात्यात जमा करण्यात आला नाही, असा आरोप त्याच्यावर आहे.
बंगळुरू प्रादेशिक ईपीएफओ आयुक्त शदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी रॉबिन उथप्पाला 4 डिसेंबर रोजी सुमारे 23 लाख रुपये जमा करण्यासाठी वॉरंट जारी केले होते. वॉरंट देण्यासाठी पुलकेशीनगर पोलीस गेले असता रॉबिन घरी आढळून आला नाही. तो आपल्या कुटुंबासोबत दुबईत असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, 27 डिसेंबरपर्यंत पैसे जमा न केल्यास रॉबिनला अटक केली जाऊ शकते.
रॉबिन 2007 T-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा [पाच धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषक जिंकला. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात रॉबिनने 8 धावा केल्या होत्या.
या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात बॉल आऊट झाला होता. यामध्ये धोनीने रॉबिनला चेंडू टाकण्याची संधी दिली. रॉबिनचा चेंडू स्टंपला लागला. भारताकडून पहिला चेंडू स्टंपला लागला, पण पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला चेंडू स्टंपमध्ये जाऊ शकला नाही. भारताने हा सामना बॉल आऊटने जिंकला.
उथप्पाने भारतासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने एकदिवसीय सामन्यात 6 अर्धशतकांच्या मदतीने 934 धावा केल्या. T-20 मध्ये उथप्पाने एका अर्धशतकाच्या मदतीने 249 धावा केल्या.