मुंबई : इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पत्र लिहून त्याने याबाबत घोषणा केली.
टीम इंडियाविरुद्धची मालिका हरल्यानंतर बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून तो टी-20 आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.
बेन स्टोक्स निवृत्तीबाबत म्हणाला की, ‘मी इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमधील माझा शेवटचा सामना मंगळवारी डरहॅममध्ये खेळणार आहे. मी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.’ बेन स्टोक्सने एप्रिल महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. बेन स्टोक्स 2019 मध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलचा सामनावीर होता. इंग्लंडने लॉर्ड्सवर न्यूझीलंडचा पराभव करत इतिहासात पहिल्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले होते.
तीनही क्रिकेट प्रकारात खेळणे माझ्यासाठी आता शक्य नाही. तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी माझे शरीर आता साथ देत नाहीये. व्यग्र वेळापत्रकामुळे खूप दमछाक होते. तसेच मला असे वाटते की मी एका दुसऱ्या खेळाडूची जागा देखील घेत आहे.
दरम्यान, “येथून पुढे माझ्याकडे जे काही आहे ते मी कसोटी आणि टी २० क्रिकेटसाठी देईन. मी कर्णधार जोस बटलर, प्रशिक्षक मॅथ्यू मॉट, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. गेल्या सात वर्षांत आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली आहे. इंग्लंडचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. मी आतापर्यंत खेळलेले सर्व १०४ एकदिवसीय सामने माझ्या आवडीचे आहेत. डरहॅममधील माझ्या घरच्या मैदानावर माझा शेवटचा सामना खेळताना मला चांगले वाटत आहे,” असे स्टोक्स पुढे म्हणाला.