पुणे : निगडी पोलिसांनी एका जगावेगळ्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी या प्रेमविराने चक्क १४ गाड्या चोरल्या होत्या.
यश किरण सोळसे (वय 20 रा. रा. तळेगाव एमआयडीसी रोड, तळेगाव दाभाडे) असे ताब्यात घेतलेल्या त्या प्रेमविराचे नाव आहे. या वाहन चोरी प्रकरणातील तो मुख्य संशयित आहे.त्याच्याकडे चौकशी केली असता अजब माहिती पोलिसांना समजली. आपल्या प्रेयसीला वाहनातून फिरविण्यासाठी त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.
सुरुवातीला सर्व काही ठीक होते, मात्र आता हे प्रियकर महाशय पोलिसांच्या अटकेत आहेत. निगडी पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.निगडी पोलीस ठाण्यातील तीन, सांगवी पोलीस ठाण्यातील चार तर तळेगाव दाभाडे, पिंपरी व देहुरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 14 गुन्हे उघड झाले आहेत.
निगडी पोलीस गस्त घालत असताना कार निगडी प्राधिकरण येथून सात दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या कारमध्ये प्रियकर महाशयांना त्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर चौकशी केल्यावर त्याच्याकडून 13 चोरीच्या मोटार सायकल व 2 चारचाकी अशा एकूण 3 लाख 45 हजार रुपयांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत.