मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका उद्यापासून म्हणजेच 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने 3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच मैदानात उतरणार असून कर्णधारपद भूषवणार आहे. यावेळीही रोहित शर्माच्या कर्णधारपदाची कठीण परीक्षा असणार आहे, कारण भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. रोहित शर्माच्या आधी टीम इंडिया विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यासारख्या दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेली होती, पण एकाही कर्णधाराला कसोटी मालिका जिंकता आली नाही.
अशा परिस्थितीत रोहित शर्मासाठी दक्षिण आफ्रिकेत होणारी ही कसोटी मालिका कोणत्याही विश्वचषकाच्या ट्रॉफीपेक्षा कमी कठीण परीक्षा नाही. जर भारतीय क्रिकेट संघाने या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान संघ दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर रोहित शर्मा हा भारताचा पहिला कर्णधार असेल ज्याने भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकून दिली. अशा परिस्थितीत हा विजय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवावर मलम म्हणून नक्कीच काम करेल.
दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील भारताची कामगिरी
1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताचा 1-0 असा पराभव केला होता.
1996-97 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केले.
2001-02 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 1-0 ने पराभूत केले.
2006-07 मध्ये दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता.
2010-11 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.
2013-14 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 1-0 ने पराभूत केले होते.
2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता.
2021-22 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 2-1 असा पराभव केला
या सर्व मालिकेपैकी फक्त एकदाच भारताने दक्षिण आफ्रिकेत खेळलेली कसोटी मालिका अनिर्णित ठेवली आहे. जे काम भारताचे अनेक दिग्गज कर्णधार दक्षिण आफ्रिकेत जाऊन करू शकले नाहीत, ते काम रोहित शर्मा करू शकेल का, हे आता पाहावे लागेल.