नवी दिल्ली: भारतामध्ये विश्वचषक सुरु असतानाच क्रिकेट जगतातून दुःखद बातमी आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान स्पिनर बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. बिशन सिंह यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. बिशनसिंग बेदी यांनी 1966 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. 1966 ते 1979 पर्यंत त्यांनी भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत. 22 कसोटी सामन्यात त्यांनी भारताचे नेतृत्व केले आहे. ते भारतासाठी एकूण 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्यांनी 273 बळी घेतले होते.
गोलंदाजीशिवाय बिशनसिंग बेदी यांच्याकडे नेतृत्व क्षमताही होती. बिशनसिंग बेदी यांची 1976 मध्ये भारताचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी 1978 पर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केले. बिशनसिंग बेदी हे एक कर्णधार म्हणून ओळखले जातात, ज्यांनी संघात लढण्याची क्षमता निर्माण केली आणि शिस्तीबाबत नवीन मानदंड प्रस्थापित केले. कर्णधार म्हणून बिशनसिंग बेदी यांनी 1976 मध्ये त्या काळातील सर्वात बलाढ्य संघ वेस्ट इंडिजचा त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभव केला.
क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही बिशनसिंग बेदी यांचा खेळाशी असलेला संबंध संपला नाही. बिशनसिंग बेदी यांनी या खेळाशी स्वत:ला दीर्घकाळ जोडून ठेवले. समालोचक म्हणूनही बेदींनी क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला. प्रशिक्षक म्हणूनही बिशनसिंग बेदी दीर्घकाळ क्रिकेटशी जोडले गेले. एवढेच नाही तर फिरकी विभागात भारताला मजबूत ठेवण्यासाठी बिशनसिंग बेदी यांनी नवीन खेळाडूंना प्रशिक्षण दिले आणि भारतीय क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत महत्त्वाचे योगदान दिले.