नवी दिल्ली : भारतीय कुस्ती परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. यानंतर निराश झालेली भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडत असल्याची घोषणा केली.
साक्षी मलिकच्या या निर्णयानंतर ब्रिजभूषण यांच्या विरूद्ध आंदोलनात समर्थ साथ देणाऱ्या बजरंग पुनियाने देखील आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. त्यानंतर आता हा वाद आणखी पेटला असून भारताचा कुस्तीपटू विरेंदर सिंहने देखील पद्मश्री परत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबाबतच ट्विट त्याने केलं आहे.
विशेष म्हणजे, या ट्विटमध्ये त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत त्यांनाही या प्रकरणी आपला निर्णय देण्याचे आवाहन केले. साक्षी मलिक ही कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तिने २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५८ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले होत.