युनूस तांबोळी
शिरूर, (पुणे) : भारतीय हिंदू संस्कृतीत मरणानंतर व्यक्तीच्या दशक्रिया विधीत पिंडाला शिवून मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कावळ्याचे मोठे योगदान आहे. मात्र पर्यावरणाच्या बदलत्या वातावणात व विषारी औषधाच्या फवारणीचा परिणाम कावळ्यांवर झाला असून कावळा ही प्रजाती आता ग्रामीण भागातही दिसेनासा होत चालला आहे.
पितृपक्षात पूर्वजाच्या आठवणी स्मरणासाठी पितृपंधरवड्यात ‘श्राद्ध’ घातले जातात. त्या काळात नैवेद्यापुरते कावळ्याचे स्मरण केले जाते. श्राद्ध हे भाद्रपद शुक्ल पोर्णिमा ते आश्विन कृष्ण अमावस्या या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृती मध्ये प्रत्येक घटकाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. यावर्षी पितृ पंधरवडा पंधरा दिवसाचा आहे. २९ सप्टेंबर पासून तर १४ आक्टोंबर पर्यत तो आहे. पितृ पंधरवड्यात पोळी, भात, भजी, दोन भाज्या, पापडी असा नैवेद्य खाण्यासाठी कावळे आवश्यक असतात.
परंतू वाढत्या निसर्गाच्या हानीमुळे दिवसेंदिवस काळळ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे पिंडदान करणाऱ्यांना तासनतास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागते आहे. एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. मात्र ग्रामीण भागात ही कावळे दिसेनासे झाले आहेत. त्याचा परिणाम अगदी सहज ऐकू येणारी कावळ्यांची काव.. काव.. आता लुप्त पावत चालली आहे. त्यामुळे या पितृपंधरवड्यात पिंडदान करणाऱ्यांना श्राद्ध घालणाऱ्यांना कावळा दुर्मिळ होत चालला असल्याचे पहावयास मिळत आहे.
का? कमी झाली कावळ्याची काव… काव…
साधारण मान्सून जून महिण्यात येतो. त्याकाळात शेतशिवारावर मशागतीचा कामे होतात. पेरणी करत असताना कीटक मातीतून वर येतात. कावळ्याचे ते मुख्य अन्न असते. त्यानंतर सप्टेंबर व आक्टोबंर दरम्यान पीक हाती येते. त्याला खाद्य उपलब्ध होते. काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे क्षेत्र घटले आहे. त्यातून शेतशिवारावर किटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम कावळ्यांना अन्न मिळणे कठीण झाले आहे. शेतात किंवा जंगलामध्ये जंगलतोड झाल्याने त्यांना घरटे करण्यास त्यातून प्रजनन करण्यासाठी जागा राहिली नाहि. यात प्रदुषण वाढल्याने या सर्वांचा परिणाम कावळ्याच्या प्रजाती वाढण्यावर झाला असून त्यांची संख्या कमी झाली आहे.
स्वच्छता दूत कावळा…
ग्रामीण भागात सुका कचरा, ओला कचरा टाकून मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. नागरिक त्यात शिळे अन्न, खरकटे अन्न बिनधास्त रस्त्यावर टाकत असतात. या अन्नावर बिनदास्त ताव मारून आपली उपजीवीका हे कावळे करत असतात. म्हणूनच त्यांना स्वच्छता दूत असेही म्हटले जाते. मात्र शेती व्यवसायाचे बाजारीकरण झाल्याने उत्पन्न वाढीसाठी शेतकरी रासायनीक खते व औषधांचा वापर करतात. मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने त्याचा वापर काही पक्षांच्या प्रजातीवर झाला आहे. त्यामुळे पक्षांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्याचे पहावयास मिळतात. पक्षी हे पिकांवरील कीड नियंत्रणासाठी मुख्य भुमीका बजावीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी मित्र समजून पक्षी संवर्धनासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले पाहिजे. असे मत पक्षी निरीक्षक मल्लारी उबाळे व सुनिल जाधव यांनी मत व्यक्त केले.